महाभारत...एक दीपस्तंभ
राग, लोभ, इर्षा, असूया, निती, अनिती, कपट, माया, आस्था, त्याग, प्रेम,मोह, काम, विकार, या आणि अश्या असंख्य भावभावनांचा कल्लोळ म्हणजे महाभारत. विचारांचे अनेक पैलू समोर येत असतानाच धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, चांगले काय, वाईट काय, असे अनेक प्रश्न पडत राहतात आणि त्यांची उकल पण होत राहते. अनादी काळापासून असलेले हे कालातीत चित्र आहे, ज्यावर असंख्य रंग छटा उमटत आहेत..
विचारांचा ,भावनांचा गुंता , त्यातील घालमेल, मानस शास्त्र उकलत जाणारी ही विचारधारा अनंत अंगाने समोर प्रकट होते. विविध कंगोरे नजरेसमोरून जातात आणि येतात, कसोटीचे क्षण येतात. महात्मे म्हणून समोर येणारी व्यक्तिमत्वे काहीवेळा अगदी सर्व सामान्य माणसाच्या वैचारिक पातळीवर येऊन अगदी हीन कृती करताना आढळतात. उत्तुंग गिरी शिखरे पादाक्रांत करता करता अचानक स्वतःला खोल खोल गर्तेत झोकून टाकताना दिसतात.. मग प्रश्न पडतो, यातील खरा कोण.. निती ने वागणारा मगाचा असामान्य मानव का अनीतीच्या कचऱ्यात स्वतःला हरवणारा एक अतिसूक्ष्म जीव.
माणूस म्हणून पाहिले की जाणवते..ही तर आपल्या सारखी हाडा मांसाची माणसे. दैव- कर्म याची सांगड घालताना यांची ही कधी कधी घालमेल झाली आहे. धर्मनिष्ठा, राजनिष्ठा, राजनीती, बंधू प्रेम, बंधू द्वेष, वचनपूर्ती याचा परिपाक म्हणजे हा महाग्रंथ. कसे वागावे नी कसे वागू नये याचा आदर्श पाठ.
कपट, असुया, अहंकार याने माखलेले शकुनी, दुर्योधन.. पुत्रप्रेम अंध झालेला धृतराष्ट्र, स्वतःच्या सर्व सुखाचा त्याग करणारे पत्रिज्ञा बद्ध धीरोदत्त पण विफल, विवश झालेले पितामह, द्युत खेळात झालेले कपट नाट्य, आणि महाभारता चे युद्ध, सारे कसे सुष्ठ विरुध्द दुष्ठ.. धर्म विरुद्ध अधर्म.महाभारत हे असंख्य धाग्यांनी विणलेले वस्त्र.. अनेक उभे आडवे , सरळ तिरके धागे.. कथानक अनेक अंगांनी फुलून आलेले, खुलून आलेले. कथेला अनेक ठिकाणी कलाटणी आहे. उपकथा आहेत.. पण याचा मुख्य गाभा आहे तो म्हणजे श्रीकृष्ण,एक महानायक. त्याच्या मुखातून जे बाहेर येते ते आहे सूर्याचे एक तेज..
गीतेमधून पुढे आलेले तत्वज्ञान हा तर महाभारताचा एक सर्वोच्च मानबिंदू. कर्म म्हणजे धर्म.. काम करत रहा. फळ मिळेल... कर्तव्य हे सर्व श्रेष्ठ.
व्यास मुनी यांनी हा ग्रंथ लिहिताना भारतीय संस्कृती चा एक सुंदर आविष्कार घडवून आणला आहे. मनाच्या कोपऱ्यात एक अजोड, अमूल्य, अतूट, असे एक सुंदर शिल्प.अनेक प्रश्नांची उकल म्हणजे महाभारत. एक आर्त,अंतर्मुख आवाज म्हणजे महाभारत.
अनाकलनीय अश्या या विश्वात, आपल्या सारखा अतिसूक्ष्म जीव हा जेव्हा गोंधळून जातो, तेव्हा काहीतरी दीपस्तंभ असे असावे, आकलनीय असे काही असावे, मनातील भ्रम दूर करणारे काहीतरी असावे... आणि ते म्हणजे महाभारतातील तत्वज्ञान.
Comments
Post a Comment